-
महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून मराठी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध
-
चांगले नाट्य लेखक घडविण्यासाठी नाट्य परिषदेने उपक्रम हाती घ्यावेत
लातूर, दि. 13 (जिमाका): मुंबईतील गरीब वयोवृद्ध नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्याकरिता वृद्धाश्रम उभारण्यासाठी मुंबईजवळच जमीन देण्याचे आपण जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने अंबरनाथ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत दोन एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. तसेच मराठी नाट्य कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाचे उद्घाटन उद्योग मंत्री श्री. सामंत बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी नमन गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर, सतीश लटके, शैलेश गोजमगुंडे, प्रदीप पाटील खंडारपूरकर, संजय अयाचित यांची यावेळी उपस्थिती होती.
राज्य शासन मराठी कलावंतांसोबत असून अखिल भारतीय नाट्य परिषदेला विविध उपक्रमांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही चांगले नाट्यकर्मी तयार होण्यासाठी नाट्य परिषदेने विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. महासंस्कृती महोत्सव, नाट्य संमेलनासारखे उपक्रम सातत्याने आयोजित होण्याची गरज आहे. चांगल्या नाटकासाठी चांगली संहिता गरजेची असते. त्यामुळे राज्यात चांगल्या नाट्य संहिता लेखकांचा शोध घेण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले जावे. नाट्य चळवळीच्या विकासासाठी बालनाट्य, हौशी आणि प्रायोगिक नाट्य रंगभूमीला बळ देण्याची गरज असल्याचे श्री. सामंत म्हणाले.
मराठी कलावंत आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महासंस्कृती महोत्सव सुरु केला आहे. यासोबतच लातूर येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विभागीय 100 वे नाट्य संमेलन होत असून जिल्हा प्रशासन आणि नाट्य परिषदेने या दोन्ही कार्यक्रमांचे चांगले नियोजन केल्याबद्दल श्री. सामंत यांनी समाधान व्यक्त केले.
सध्या ग्रामीण भागात अनेक चांगली नाटके लिहून सादर केली जात आहेत, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण कलाकारांनी भाषेची भीड न बाळगता आपल्या नाटकांची संहिता लेखन आणि सादरीकरण दमदार करण्यावर भर देण्याची गरज आहे. यामधूनच उद्याची व्यावसायिक नाटके आणि नाट्य कलावंत घडतील, असा विश्वास नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी व्यक्त केला. तसेच प्रायोगिक रंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमीची प्रयोगशाळा आहे. येथेच कलाकार खऱ्या अर्थाने घडतात. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीला बळ देवून प्रायोगिक नाटकांची चळवळ रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महासंस्कृती महोत्सव, तसेच विभागीय 100 वे नाट्यसंमेलनामुळे लातूरचे सांस्कृतिक वैभव उजळणार आहे. तसेच लातूरमधील नाट्य चळवळ रुजण्यासाठी या कार्यक्रमांची मदत होईल, असा विश्वास पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांनी सांगितले.
लातूर येथे होत असलेल्या महासंस्कृती महोत्सव व विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाचे अतिशय चांगले आयोजन करण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अचूक कार्यक्रमांची निवड करून रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्याचा प्रयाण कौतुकास्पद असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
लातूर जिल्हावासियांना महासंस्कृती महोत्सव, तसेच विभागीय 100 वे नाट्यसंमेलनामुळे अतिशय चांगली सांस्कृतिक मेजवानी मिळाली असून या कार्यक्रमांच्या आयोजनाची संधी लातूरला दिल्याबद्दल आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
महासंस्कृती महोत्सव, तसेच विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाच्यामाध्यमातून जिल्हा प्रशासन आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लातूर शाखेने नागरिकांसाठी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामाध्यमातून स्थानिक कलावंतांना संधी देवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर, सतीश लटके यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश गोजमगुंडे यांनी केले. यामध्ये त्यांनी महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलन आयोजनाचा हेतू विशद केला. नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नाट्यसंमेलन स्मरणिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मेहनत घेत असलेले शासकीय अधिकारी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
‘येळवस’ च्या दालनाला ना. उदय सामंत यांची भेट
महासंस्कृती महोत्सवात लातूरच्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या वेळ अमावस्या अर्थात ‘येळवस’चे स्वतंत्र दालन दयानंद महाविद्यालय मैदानाच्या खाद्य दालनात उभारण्यात आले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित मान्यवरांनी आज या दालनाला भेट दिले. तसेच येळवसला बनविण्यात येणाऱ्या भज्जी, आंबिल आणि उंडे या पदार्थांचा आस्वाद घेतला.
0000