उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. १६:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

श्री.पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नटराज मंदिर परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव , उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

नटराज मंदिर परिसरातील कॅनालच्या समांतर असलेले पदपथ स्वच्छ राहतील याची दक्षता घेतानाच सार्वजनिक कामांचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर पोलिसांनी कार्यवाही करावी. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम अंतिम आराखड्याप्रमाणे पूर्ण करावे. परिसरातील रस्त्याचा विचार करुन पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात.

कन्हेरी वनविभागात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोयीस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत. या सर्व सार्वजनिक कामांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.