मुंबई, दि. 21 : सातारा शहरातील नगरपालिका हद्दीत पोवई नाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट (आयलँड) विकसित करण्याची कार्यवाही करून शहराच्या सौंदर्यात भर घालावी. याठिकाणी जागेची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे करावी. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे याविषयी आढावा बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस नगर रचना संचालक प्रतिभा भदाणे, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साताराचे जिल्हाधिकारी प्रदीप डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी चर्चेत सहभाग घेतला.
बाळासाहेब देसाई आयलँड विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या आयलँडवरील बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याचे डिझाईन अंतिम करावे. आचासंहितेपूर्वी काम सुरू करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. सातारा येथील जिल्हा लोकल बोर्ड इमारत हेरीटेज दर्जा असलेली इमारत आहे. या इमारतीचा पुनर्विकास हेरीटेज दर्जानुसार करावयाचा असून त्यासाठी अशा प्रकारचे काम करणारा कंत्राटदार असावा. हेरीटेज कामाला कुठेही धक्का न लागता दुरूस्तीचे काम करावे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम करून काम सुरू करावे, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
***