विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विधिमंडळातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला, युवा, शेतकरी, कष्टकरी, कामगार यासह सर्व वर्गांसाठी निर्णय घेतले. या अधिवेशनात नऊ विधेयके संमत झाली.  वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी पूरक व देशाच्या विकासात योगदान देणारा हा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळला. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना पूर्ण काळजी घेतली. सर्वोच्च न्यायालायाने काढलेल्या त्रुटी दूर करून आरक्षण दिले. यासाठी अधिसूचनाही काढण्यात आली.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन देण्यासंदर्भातचा आज निर्णय जाहीर केला. यासंबंधीही शासकीय कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता, तो या निमित्ताने पाळला. सरकारचे चांगले काम सुरू असून तळागाळात जाऊन काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आली आहे. यासंबंधी एका संस्थेने केलेल्या अहवालातही ही बाब नमूद केली आहे. राज्यात देशातील सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

सन 2024 चे विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

विधेयकांची व अध्यादेशांची यादी

पूर्वीची प्रलंबित विधेयके  :                       06

नवीन विधेयके               :                       10

एकूण                           :                       16

दोन्ही सभागृहात संमत     :                       09

संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक   :   06

विधानपरिषदेत प्रलंबित    :                       01

एकूण                           :                       16

दोन्ही सभागृहात संमत

(1) सन 2024 चे वि.स.वि. क्र. 5 –  महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)

(2) सन 2024 चे वि.स.वि. क्र. 3.- महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2024 (गृह विभाग) (पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग यांचा विशेषीकृत अभिकरणांमध्ये समावेश करण्याबाबत) (3) सन 2024 चे वि.स.वि. क्र. 4.- मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग) (भांडवली मुल्य निश्चित करणे शक्य नसल्याने 2023-24 चे जे भांडवलीमुल्य होते तेच 2024-2025 या वर्षीसाठी सुधारणा करण्यासाठी विधेयक)

(4) सन 2024 चे वि.प.वि. क्र. 1.- महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण) (विधान परिषदेत पुर:स्थापित, विचारार्थ व संमत दि. 28.02.2024, विधानसभेत विचारार्थ व संमत दि. 29.02.2024)

(5)सन 2024 चे वि.स.वि. क्र. 6-डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (कलम 6 मध्ये NEP -2020 च्या तरतूदींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुधारणा)

(6) सन 2024 चे वि.स.वि. क्र. 7.- महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, 2024              (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सचिवांचा सहकारी जिल्हा संवर्ग घटीत करणे व अशा संवर्गासाठी सेवायोजन निधी स्थापन करणे व कलम 88 खालील  चौकशी व कार्यवाही पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षांवरुन 1 वर्ष इतका कमी करणे)

(7) सन 2024 चे वि.स.वि.क्र. 8-  महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान)  विधेयक, 2024 (वित्त विभाग) (विधानसभेत संमत दि. 01.03.2024, विधान परिषदेत संमत दि. 01.03.2024)

(8) सन 2024 चे वि.स.वि.क्र.9- महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग)

(9) सन 2024 चे वि.स.वि.क्र. 10- महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (सुधारणा) विधेयक, 2024(उद्योग उर्जा व कामगार विभाग)

संयुक्त समितीकडे प्रलंबित

(1)        सन 2023 चे वि.स.वि.क्र.34.- महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी  कामगार (नौकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नौकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा ) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)

(2)        सन 2023 चे वि.स.वि.क्र.40- महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणीत किंवा गैर छापाची बियाणे, खते  किंवा  किटकनाशके  यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, 2023

(3)        सन 2023 चे वि.स.वि.क्र.41- किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(4)        सन 2023 चे वि.स.वि.क्र.42- बी-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(5)        सन 2023 चे वि.स.वि.क्र.43- अत्यावश्यक वस्तु (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(6)        सन 2023 चे वि.स.वि.क्र.44.- महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023

विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके

(1)        सन 2024 चे वि.स.वि. क्र. 2.- महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2024              (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सन 2024 चा महा. अध्यादेश क्र. 01 चे रुपांतरीत विधेयक) (सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्या विरुध्द अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यासाठीचे मागणीपत्र देण्याचा कालावधी सहा महिन्यांवरुन दोन वर्षांपर्यंत वाढविण्याची कलम 71 एक-ड ची सुधारणा)

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ