रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा

 मुंबई, दि. 6 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

प्रधानमंत्री यांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले होते.

प्रधानमंत्री लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.

मागील पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.

सर्व प्रकल्प आणि विकासकामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

0000