मुख्यमंत्र्यांची आपला दवाखान्याला अचानक भेट
मुंबई, दि.७: मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशीदेखील संवाद साधला.
मुंबईकरांचा आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीदेखील सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्र्यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रुम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छतागृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपला दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत.
मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.