चाळीसगावच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

        जळगाव दि. 7 (जिमाका) महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

चाळीसगांव येथील नूतन उपविभागीय उपप्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, राज भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, संजय गरूड, जिल्हा बॅक अध्यक्ष संजय पवार, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपआयुक्त श्याम लोही, मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे, प्रांताधिकारी प्रमोद हिले,अपर पेलिस अधीक्षक कविता नेरकर आदींसह आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्य व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपविभागीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती झाल्याने नागरिकांनी देखील आता वाहतुकी संदर्भातील नियमावली पाळणे गरजेचे असल्याचे सांगून वाहतुकीचे नियम मोडणार्‍यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी हेाईल यासाठी नागरिकांनी देखील परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

हेमंत जोशी पटागंणावर उभारण्यात आलेले हे कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालयासाठी ४० कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून लवकरचं नवीन कार्यालय बांधण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करतांना आपल्या मतदारसंघातील विकासकामासाठी संबंधित मंत्र्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी मिळवून घेतात. त्यामुळेच जिल्हयातील इतरांपेक्षा जादा निधी चाळीसगांवला येतो.

जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आ. मंगेश चव्हाण यांचा नेत्यांशी व मंत्र्यांशी असलेला संपर्क  राहून शासनाच्या विविध योजनेतून मोठा निधी आणून विकासकामे करतात. त्यांच्या कामाचा सपाटा नक्कीच कौतुकास पात्र आहे.

ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय तसेच तालुका क्रिडा संकुलातील बहुउद्देशीय हॉल व इतर विकास कामांचे ऑनलाईन उद्धघाटन करण्यात आले. चाळीसगांव उपप्रादेशिक उपविभागीय कार्यालयातून एम.एच ५२ या क्रमांकाची सिरीज सुरू करण्यात आली असून नेांदणी करून नवीन क्रमांक घेणाऱ्या वाहनमालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

00000