राजकारणात कार्य करताना विविध विषय, पक्षाची भूमिका आणि विधिमंडळातील आयुधांविषयी जाणून घ्या – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
9

पुणे,दि.७:- राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असतांना या क्षेत्रात काम करताना महिलांनी विविध विषयांचा अभ्यास, पक्षाची भूमिका आणि विधिमंडळातील आयुधांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे,  असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महिला दिनाच्या औचित्याने नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात आयोजित ‘महिलांचे राजकीय सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. चर्चासत्रास प्रा. उल्हास बापट, आयएलएस विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा पातूरकर, प्रा. बिंदू रोनाल्ड, ॲड. विजयालक्ष्मी खोपडे, नवलमल विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, ॲड. अशोक पाळंदे उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राजकारणात महिलांचा सहभाग वाढतो आहे. आज केवळ ८ टक्के महिला राजकारणात सक्रीय आहेत. नव्या विधेयकानुसार महिलांचे राजकारणातील प्रमाण वाढणार आहे, त्याला काही कालावधी लागेल. राजकारणात स्वत:ला सिद्ध करतांना महिलांना राजकीय क्षेत्रात सक्रीय होऊन राजकीय विचार मांडावे लागतील. राजकीय क्षेत्रातील महिलांनी विविध अहवालांचा, विचारांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासासोबत पक्षाची भूमिका ठासून मांडण्याची कला अवगत असावी. विधिमंडळात उपयोगात येणाऱ्या आयुधांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. योग्य आयुधांचा अचूक वेळेला उपयोग करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

समाजात कुटुंबियांच्या मतानुसार मतदान करणारी स्त्री आता स्वत:चा निर्णय घेऊ लागली आहे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने ही सकारात्मक बाब आहे. निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळ्या स्तरावर महिलांचा सहभाग असतो. महिला उमेदवार, महिला अधिकारी, माध्यमांतील महिला अशा विविध स्तरांवर महिला आपली भूमिका बजावत असतात. लोकशाहीत महिला मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महिला मतदारांनी  अधिकारांबाबत जागरूक रहात  आपल्या आकांक्षापूर्ततेसाठी जागरूक राहून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय क्षेत्रात वावरतांना महिला लोकप्रतिनिधींना अनेक आव्हानांना सामारे जावे लागते, त्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महिलांनी धैर्याने काम करावे. लोकशाहीत आपली भूमिका इतरांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी माध्यमे महत्त्वाचे कार्य करत असल्याने महिलांनी माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडणे गरजेचे आहे. माध्यमाद्वारे जनतेशी जोडले न गेल्यास राजकारणात मागे राहण्याची शक्यता असते.

पक्षासोबत विविध क्षेत्रातील संस्था, संघटना, प्रतिनिधी यांच्याशी सातत्याने होणारा संवाद उपयुक्त ठरतो. जनता आपली मार्गदर्शक आहे हे लक्षात घेऊन काम केले तर राजकीय क्षेत्रात चांगला प्रभाव पाडता येतो. विधानसभेतील महिलांची भूमिका बघत असताना तिथे तुम्ही महिला म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते, असेही डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी व मतदानाविषयी जागरुकता दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विधी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here