क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत ७२ हजार लाभार्थ्यांना १६.२० कोटी निधी – आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

0
3

मुंबई दि. ११ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत ७२ हजार पाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये १६.२० कोटी एवढा निधी जमा करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या १० हजार २९० लाभार्थ्यांना २९०० प्रमाणे नऊ महिन्यासाठीचा रूपये २६.८६ कोटी एवढा निधी जमा करण्यात आला असल्याची माहिती, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगोपन योजना राबविण्यात येत आहे. अनाथ, निराधार, निराश्रीत, कैद्यांची बालके, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, भिक्षेकऱ्यांची बालके, कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना  पर्यायी कुटूंब उपलब्ध करून देणे, त्यांचे संस्थेतील वातावरणाऐवजी कौंटुंबिक वातावरणामध्ये पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत करण्यात येतो. २०२३ – २४ या वित्तीय वर्षासाठी एकूण ७३ हजार ८९ बालकांची माहिती आयुक्तालय स्तरावर प्राप्त झाली आहे. त्यानुसार या बालकांना आयुक्तालय स्तरावरून रक्कम अदा करण्यात येणार असल्यामुळे प्रायोगिक तत्वावर एका महिन्याच्या लाभापोटीची रक्कम बँकेमध्ये जमा करण्यात आली होती. मात्र, खाते क्रमांक, के.वाय.सी. नसणे, अर्धवट खाते क्रमांक अशा विविध त्रुटींमुळे बालकांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम जमा झाली नाही. संबंधित त्रुटींची पुर्तता करून त्यानुसार ७२ हजार पाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये १६.२० कोटी एवढा निधी जमा करण्यात आला असल्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

याचबरोबर केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत सन २०२२ – २३ या वित्तीय वर्षाच्या प्रायोजकत्व, प्रतिपालकत्व आणि आफ्टर केअर सेवा या योजनेसाठी मंजूर निधीमधून कोरोना च्या संसर्गामुळे दोन्ही किंवा एक पालक गमावलेल्या १० हजार २९० लाभार्थ्यांना २९०० प्रमाणे नऊ महिन्यासाठीचा रूपये २६.८६ कोटी एवढा निधी जमा करण्यात आला आहे, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here