ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे 

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ही महामंडळे स्थापन करण्यात आली असून या नव्याने स्थापन केलेल्या महामंडळाच्या उपकंपनींचे व त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या पोर्टलचे व नवीन कार्यालयाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री श्री. सावे म्हणाले, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील समाजाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच विविध क्षेत्रातील स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गुरव समाजाकरिता संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ, वीरशैव लिंगायत समाजाकरिता जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि नाभिक समाजाकरीता संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या महामंडळांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ  या मुख्य कंपनीची उपकंपनी म्हणुन स्थापना केली आहे. या तीन्ही महामंडळांचे कार्यक्षेत्र ३६ जिल्हयात आहेत.

वैयक्तिक व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत पात्रता प्रमाणपत्र, थेट कर्ज योजनेंतर्गत लाभार्थीना मंजुरीपत्राचे वितरण मंत्री श्री. सावे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या उपकंपनीच्या योजनांची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर यांनी दिली. या कार्यक्रमास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ