शाश्वत बांबू विकास कार्यक्रमासाठी गठीत कार्यकारी समितीची पहिली बैठक संपन्न

मुंबई, दि. १५ :- वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी तसेच शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फ़ोर्स स्थापन करण्यात आला आहे. बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रेरित करणे यासाठी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शाश्वत बांबू विकास कार्यक्रम कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यकारी  समितीची पहिला बैठक आज समितीचे अध्यक्ष श्री. पटेल यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे झाली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अप्पर मुख्य सचिव , कृषी श्री अनुपकुमार यांच्यासह समिती सदस्य विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

आजच्या बैठकीमध्ये बांबू लागवडीविषयी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. हे  उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राबवावयाच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेविषयी सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड फायद्याची असून मनरेगा अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. त्यापासून शेतकऱ्यांना होणारे फायदे याविषयी करावयाच्या जनजागृती विषयीही चर्चा करण्यात आली.

वातावरणीय बदलाच्या संकटाचा समाना करण्यासाठी बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना त्याचे महत्व पटवून देणे, जनजागृती करणे याविषयी ही कार्यकारी समिती काम करत आहे.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ