अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान झाले पाहिजे – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर

0
13

सोलापूर, दिनांक 28(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 32 शासकीय विभाग हे अत्यावश्यक सेवेत येतात. या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक काळात निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या असतात. तरी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभागाकडून पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट चे मतदान करण्याविषयी ची माहिती तात्काळ सादर करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सेवेतील विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पोस्टल बॅलेटचे नोडल अधिकारी अमृत नाटेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपवन संरक्षक कार्यालयाचे जी.एस. चोपडे, माहिती व प्रसारण कार्यालयाचे अंबादास यादव, रेल्वेचे शेख मस्तान, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, महावितरण चे राजेंद्र सावंत, भीमा कालवा चे अधीक्षक अभियंता डी.ए.बागडे व अन्य विभाग प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 19 मार्च 2024 रोजी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 32 शासकीय कार्यालयाच्या सेवा ह्या अत्यावश्यक सेवेत येत असल्याचे सांगून या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांची सेवा मतदानाच्या दिवशी घेतलेली असेल तर त्याबाबतचे पत्र व यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे दिनांक 17 एप्रिल 2024 पर्यंत पाठवावी. त्यानंतर या यादीतील अधिकारी कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दिवशी निवडणूक कामकाज दिलेल्या असल्याचे पाहणी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी टपाली मतदान अमृत नाटेकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व  माढा लोकसभेचे दोन मतदारसंघ येत असून यासाठी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा घेतलेल्या असतील तर त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे. टपाली मतदानापासून एकही अधिकारी कर्मचारी वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक विभागाकडून टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे तरी टपाली मतदानासाठी दिनांक 12 ते 17 एप्रिल या कालावधीत संबंधित विभाग प्रमुखांनी विहित प्रपत्रात माहिती सादर केल्यास त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी सोलापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा विहित कालावधीत उपलब्ध करून दिले जाणार असून त्याबाबतची माहिती संबंधित विभागामार्फत मतदारापर्यंत पोहोचवण्यात येईल असेही श्री नाटेकर यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा विषयी सविस्तर मार्गदर्शन पीपीटी द्वारे केले. तसेच संबंधित अधिकाऱ्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही यावेळी त्यांनी दिली.

*अत्यावश्यक सेवेतील विभाग-

आयुक्त सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, उपवनसंरक्षक,  केंद्रीय माहिती कार्यालय, रेल्वे विभाग, डाक विभाग, बीएसएनएल, दूरदर्शन, आकाशवाणी, भारतीय विमानतळ, भारतीय अन्नधान्य मंडळ, राज्य उत्पादन शुल्,  जिल्हा कारागृह अधीक्षक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, भीमा कालवा मंडळ, महावितरण, कोषागार, पुरवठा विभाग, होमगार्ड, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, दुग्ध विकास विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अग्निशामन विभाग, माहिती विभाग, दीव्यांग कल्याण, वाहतूक पोलीस आदी विभागाच्या यात समावेश होतो.

********

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here