मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करा – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर

0
15

नागपूर, दि. 2 :  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांना किमान आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करीत मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी निवडणूक यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, विविध विभागांचे विभागप्रमुख प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मतदान केंद्रांवर आवश्यकतेनुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयं सेवकांची व्यवस्था करण्यात यावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेची दक्षता घेऊन आयोगाच्या सूचनांनुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. इटनकर यांनी बैठकीत दिल्या.

मतदान केंद्रावर पोहोचण्यास मतदाराना त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मतदानाची तारीख लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा देताना आवश्यक औषधे मतदान केंद्रावर उपलब्ध ठेवण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

******

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here