‘मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर !

मतदार जागृती दौड उत्साहात

 

नागपूर, दि. 15 : जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा निवडणुकीत 75 टक्क्यांवर मतदानाचे ध्येय ठेवले आहे. यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृती दौडचे आयोजनही त्याचाच एक भाग असून मिशन डिस्टिंक्शनसाठी आयोजित ‘रन फॅार डिस्टिंक्शन’ या दौडमध्ये नागपूरकर मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचा आनंद असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

जिल्हा निवडणूक विभाग आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘रन फॅार डिस्टिंक्शन’ ही मतदार जनजागृती दौड आयोजित करण्यात आली. या दौडला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इटनकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी सौम्या शर्मा, परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, पोलिस उपायुक्त अर्चित चांडक,  महानगरपालिका उपायुक्त मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, रंजना लाडे, महेश धामेचा, मुख्य अभियंता राजीव गायकवाड  यांच्यासह जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, स्वीप आयकॅान आदी उपस्थित होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी लक्षात घेता यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्हयातील मतदानाचे प्रमाण वाढून मिशन डिस्टींक्शन यशस्वी व्हावे यासाठी आज सकाळी 6 वाजता ही दौड आयोजित करण्यात आली. एकूण तीन प्रकारात या दौडचे आयोजन करण्यात आले.  यात  3,  5 आणि 10 किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली. कस्तुरचंद पार्क येथून या दौडची सुरुवात करण्यात आली. या दौडमधील विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, नागपूरकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

कार्यक्रमस्थळी विविध स्टॅाल्स, सेल्फी पॅाईंट, मतदानाची माहिती देणारे पोस्टर्स, होर्डिंग्स अशा मतदार जनजागृतीपर साहित्याच्या माध्यमातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.