अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

0
8

मुंबई, दि. २० :  अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील मैदानावर २० एप्रिल रोजी पार पडला.

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिन् या जहाजाला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात अग्निशमन व विमोचनाचे कार्य करीत असताना मुंबई अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रत्येक वर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहाचे उ‌द्घाटन राज्यपाल यांच्या शुभहस्ते राजभवन येथे १४ एप्रिल रोजी झाले. या सप्ताहाच्या सांगता समारोहासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालय अग्निशमन सेवा-सिव्हील डिफेन्स व होम गार्डचे महासंचालक विवेक श्रीवास्तव, आयपीएस यांनी उपस्थित राहून संचलनाची मानवंदना स्विकारली. याप्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

राज्याचे अग्निशमन सेवा संचालक आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संतोष वारीक यांनी अग्निशमन सेवा सप्ताहाबाबत प्रस्तावना केली. राज्यातील विविध महानगरपालिका, विशेष नियोजन प्राधिकरणे तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट, भाभा अॅटोमिक रिचर्स सेंटर, इत्यादींच्या अग्निशमन सेवांचे प्रमुख अग्निशमन अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

या सप्ताहामध्ये अग्निशमनाबाबत विविध प्रसार माध्यमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तसेच नियमीत अग्निशमन दलातील जवानांसाठी विविध फायर ड्रिल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच स्वातंत्र्यदिन-२०२३ आणि प्रजासत्ताक दिन-२०२४ या प्रसंगी ज्या अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रपतींची अग्निशमन सेवा पदके जाहिर झाली त्यांना प्रमुख अतिर्थीच्या शुभहस्ते सन्मान चिन्हे प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.

केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने अग्निशमन सेवांची तूट टप्प्या-टप्याने भरुन काढण्यात येत आहे. राज्यात अग्निशमन कायदा सन २००८ पासून अंमलात आला असून यामध्ये काळानुरुप काही सुधारणा करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या सुधारणांमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक इमारती, तसेच गोदामे आणि शीतगृहांच्या इमारतींची उंची वाढविणे, अग्निशमन व जीवसंरक्षक लेखा परीक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे, यासारख्या सुधारणा अग्निशमन कायदयात करण्यात येणार आहेत.

000

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here