पुणे, दि. २१ : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे; त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा करण्यासोबत त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक आनंधी पालानीस्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार, निवडणूक पोलीस निरीक्षक जॉएस लालरेमावी, मावळ मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय, व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून श्री. चोक्कलिंगम म्हणाले, एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्ष ठेवण्यात यावा. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी शक्य असल्यास शहरी भागात प्रतीक्षा कक्षाची सुविधा करावी. उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींना मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानासाठी पगारी रजा देण्याच्या सूचना द्याव्यात.
निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना करा. मतदान संबंधी सर्व अहवाल वेळेत सादर करावे. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे १०० मिनिटात निवारण करावे. मतदानाच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मतदान केंद्र पथकाला मतदान आणि ईव्हीएमविषयक सूक्ष्म बाबींचे प्रशिक्षण द्यावे.
निवडणुकीत पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषाचे वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. समाजमाध्यमाद्वारे चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, आदी सूचना त्यांनी दिल्या.
निवडणूक विषयक नियमांचे उल्लंघन कोणत्याही घटकाद्वारे होऊ नये यासाठी पोलीस विभागासोबत सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहावे. कमी मतदान असलेल्या १० मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करून हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्यात. मतदार माहिती स्लीप आणि माहिती पत्रकाचे वाटप वेळेवर करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यात महानगरपालिका आणि नगरपालिकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी आवश्यक प्रयत्न करावे, असेही श्री.चोक्कलिंगम म्हणाले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, श्री.चौबे आणि पोलीस अधीक्षक श्री.देशमुख यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सदारीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलीस विभागाच्या सहकार्याने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मावळ, बारामती आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही निवडणूक तयारीची माहिती सादर केली. बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.
000