मुंबई, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात, समन्वय अधिकारी तुषार मठकर, वरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानी, उपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना श्री.पानसरे म्हणाले, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत असून 26 एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी श्री. पानसरे यांनी मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. नामनिर्देशन पत्रे भरण्यापासून प्रचार विषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.थोरात यांनी टपाल मतपत्रिकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. श्रीमती खातू यांनी उमेदवारांनी निवडणूक खर्चाविषयी ठेवण्याच्या नोंदी आणि त्याबाबतच्या नियमांविषयी माहिती दिली.
****
शैलजा पाटील/विसंअ/