सातारा, दि. १ :- मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाचा दिवशी प्रत्येक कुटुंबातील पात्र नागरिक मतदान करतील यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन 50 ते 60 कुटुंबाच्या मागे शासकीय प्रतिनिधी नियुक्त करावा. या प्रतिनिधींनी मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी जबाबदारी दिलेल्या प्रत्येक कुटुंबाला भेट देवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात लोकसभा निवडणूक तयारी विषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासह नोडल अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहे तथापी यापुढे जावून या टप्प्यात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहेत असे सांगून श्री. डुडी म्हणाले, ग्रामीण भागात लोकांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करावे या पथकात ग्रामीण भागात काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश असावा तसेच शहरी भागात नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभग राहील. ही पथके मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी सकाळी 7, दुपारी 12 ते 1 व सायं. 4 वाजता घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबाला भेट देतील व पात्र नागरिकांनी मतदान करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करतील.
मतदानाच्या शेवटच्या 72 तासांत नियमनासाठी असणारी कार्यप्रमाणाली काटेकोरपणे अंमलात येईल यासाठी दक्षता घ्यावी. पैसे वाटपाबरोबर अवैध बाबी घडू नये सासाठी फिरते व स्थायी पथकअधिक गतीमान करावीत.
सर्व प्रांताधिकारी यांनी जिल्ह्यातील उद्योग प्रतिनिधींची बैठक घ्यावी. या बैठकीत उद्योगांमधील कर्मचारी 100 टक्के मतदान करतील यासाठी भरपगारी सुट्टी देण्याबाबत सांगावे. तसेच हॉटेल असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन यांचीही बैठक घ्यावी. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने महिला बचत गटांची बैठक घेऊन त्यांच्या कुंटुंबातील नागरिकांनी 100 टक्के मतदानाचा हक्क बजावतील याबाबत दक्षता घेण्यास सांगावे.
प्रत्येक मतदान केंद्रावर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी त्याचबरोबर औषधे ठेवण्यात यावी. जिल्हा परिषदेमध्ये एक कक्ष स्थापन करुन या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करुन द्यावा फिरते आरोग्य पथक तैनात ठेवावे गरज असेल त्या ठिकाणी फिरते आरोग्य पथक पाठवावे.
या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन म्हणाल्या, प्रत्येक मतदान केंद्रावर सेायी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील दोन मतदान केंद्रे थीमवर तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जय जवान जय किसान, कृषी, महिलांसाठी,तरुणांसाठी, दिव्यांगासाठी विशेष मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात नागरिकांना मतदान करण्याविषयी मतदानाविषयी करण्याविषयी प्रोत्साहित करण्यात येत आहे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
000