देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. 1 : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. लोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवुन करण्यात आली. या रॅली मध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी किरण महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे, उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, स्वीप चे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आणि जिल्ह्यातील सायकल ग्रुपचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज महाराष्ट्र दिनी या  बीवायसीएस, मुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने मार्ग बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, अंधेरी क्रीडा संकुल, एनसीपीए, दक्षिण मुंबई आणि मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर  येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि मतदानाचे आपले कर्तव्य बजावण्याचा संकल्प केला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून ‘मी मतदान करणार’ अशी प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली.