संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

0
14

सांगली दि. 2 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदान होत आहे. लोकसभा  निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले.

जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज सांगली शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र संजयनगर ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडांगण या मार्गावर संवाद यात्रा काढण्यात आली. संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जिल्हास्तरीय स्वीप  समितीचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला मतदारांशी संवाद

मतदान करून लोकशाही बळकट करूया असे मतदारांना आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या संवाद यात्रेत महिला, ज्येष्ठ मतदार, युवा मतदार यांच्याशी संवाद साधून 7 मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यास पुढे यावे,असे आवाहन केले.

संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

संवाद यात्रेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिलांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. एक मत लोकशाहीसाठी,  मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो अशा घोषवाक्याचे फलक दर्शवत मतदारांना आवाहन करण्यात आले. या संवाद यात्रेतून मतदार जागृतीचा जागर घुमला.

मतदान आवाहन पत्राचे मतदारांना वाटप

संवाद यात्रेत मतदारांशी संवाद साधताना मतदान करण्याचे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांना मतदान आवाहन पत्रे दिली. मतदारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर , अत्यावश्यक आरोग्य सुविधाची सोय करण्यात आल्या आहेत. मतदारांनी, निर्भयपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here