मुंबई उपनगर, दि. 3 : लोकसभा निवडणुका 2024 मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राचे स्व-प्रमाणन अधिकृत केले आहे, त्यामुळे हे प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित करून घेण्याची धावपळ वाचेल.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.
प्रत्येक निवडणुकीत फॉर्म – एम भरताना येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे मताधिकाराचा अधिकार बजावण्यात होणारा त्रास याबाबत अनेक काश्मिरी स्थलांतरित गटांकडून विविध निवेदने प्राप्त झाली. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील योग्य विचारविनिमय करून आणि राजकीय पक्षांच्या पूर्ण सहमतीने 9 एप्रिल रोजी आयोगाला टिप्पण्या सादर केल्या. या योजनेबाबत अनेक काश्मिरी स्थलांतरित गटांकडून प्राप्त झालेली निवेदने, राजकीय पक्षांचे अभिप्राय आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या टिप्पण्या विचारात घेतल्यानंतर, काश्मिरी विस्थापितांनी संक्रमण शिबिरांमध्ये वैयक्तिकरित्या मतदान करण्याची आणि दिनांक 11 एप्रिलच्या आदेशाद्वारे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया आयोगाने अधिसूचित केली.
—–000—–
दीपक चव्हाण/स.सं