लातूर, दि. 03 : युवावर्ग हा देशाचे भविष्य असून आपल्या देशातील वैभवशाली लोकशाही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी युवावर्गाने आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे मतदान करून घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. निमित्त होते जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत आयोजित मतदार जागृती कार्यक्रमाचे. यावेळी उपस्थित युवा मतदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजाविण्याचा निर्धार करीत जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, स्वीपचे नोडल अधिकारी रामदास कोकरे आणि नागेश मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा, विजय माळाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि युवक यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी साडेसहा वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी मतदार जागृतीपर गीतांवर आधारित झुम्बा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा संकुलावर नियमितपणे व्यायामासाठी आणि विविध खेळांच्या सरावासाठी येणारे युवक-युवती यांनी या झुम्बा डान्समध्ये सहभागी होत ठेका धरला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनीही यामध्ये सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढविला. या माध्यमातून युवा वर्गापर्यंत मतदानाचे महत्व गीताच्या माध्यमातून पोहाेचविण्यात आले.
मतदार जागृतीसाठी जिल्हा क्रीडा संकुलावरील 400 मीटर स्वीप ध्वजाची मिरवणूक आयोजित करण्यात आली. उपस्थित युवावर्ग, नागरिकांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून महाराष्ट्र राज्याचा नकाशा साकारून मतदार जागृतीचा संदेश दिला. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित स्वाक्षरी मोहिमेस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते यावेळी प्रारंभ झाला. दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक संदीपन जगदाळे यांनी आपल्या पहाडी आवाजात मतदार जागृतीचा पोवाडा सादर करून आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेचा इतिहास मांडला. तसेच ही लोकशाही व्यवस्था बळकट करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असून प्रत्येकाने 7 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी तरुणाईवर : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. साहजिकच आपल्या देशात तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजाविणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका तरुणाईची आहे, तरुणाईने ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे येत्या 7 मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानामध्ये लातूरला अग्रेसर बनविण्याचा निर्धार युवक-युवतींनी करावा. प्रत्येक युवक-युवतीने 7 मे रोजी मतदान करावे. तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, आपल्या मित्र-मैत्रिणी यांना मतदानासाठी आग्रह धरून त्यांचे मतदान होईल, यासाठी पाठपुरावा करावा. आपल्या जिल्ह्याला मतदानात नंबर वन बनविण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.
*****