मुंबई उपनगर, दि. 10: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने खर्च निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही निरीक्षकांनी गुरुवारी रात्री मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
निवडणूक निरीक्षक श्री. चंदन आणि श्री. छत्रपती यांनी माध्यम कक्षातील टेलीव्हीजन मॉनिटरिंग, सोशल मीडिया मॉनिटरिंग, वर्तमानपत्रातील बातम्या, पेड न्यूज आदींबाबत सविस्तर माहिती घेतली. सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवरील उमेदवारांच्या अकांऊंटवर कशा प्रकारे नजर ठेवली जात आहे, याचीही त्यांनी माहिती घेतली. उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचारासाठी केलेल्या खर्चासंदर्भात माहिती खर्च नियंत्रण पथकाला देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
निरिक्षकांना जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण कक्षाचे समन्वयक केशव करंदीकर यांनी त्यांना कक्षामार्फत कशाप्रकारे काम सुरु आहे, त्याची माहिती दिली. याशिवाय, निवडणूक प्रशासनाच्या विविध बाबींना वर्तमानपत्र आणि विविध माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येत असल्याचे सांगितले.
दोन्हीही खर्च निरीक्षकांनी माध्यम कक्षाद्वारे केल्या जात असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. ००००
दिपक चव्हाण/वि.सं.अ