मुंबई उपनगर, दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघात एकूण १७३ मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.
१५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन आस्थेने त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे १५६ – विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गीता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
१६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ, १५६ विक्रोळी, १७० – घाटकोपर पूर्व, १५७ – भांडूप पश्चिम, १७१ – मानखुर्द शिवाजीनगर, तसेच १५५- मुलूंड या विधानसभा मतदारसंघात समन्वय अधिकारी यांनी पथकासह मतदारांच्या घरी जाऊन गुप्तपणे गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडली. उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे, समन्वय अधिकारी श्री. वानखेडे, तहसीलदार वृषाली पाटील, एस. ए. खानविलकर, तहसिलदार ज्योती वाघ, तहसीलदार सतीश कदम या अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह गृहमतदानाची जबाबदारी पार पाडली.
विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे यांनी केले मतदान
आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईल, असेच वाटत होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाही, मतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई कुपटे या १०० वर्षीय आजीबाई यांनी यावेळी व्यक्त केला. तरूणांनीही मतदान नक्की करावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/