आपले मत मनात नको राहायला… विसरू नका मतदान करायला !

0
11

मुंबई उपनगर, दि. 18: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी  येत्या 20 मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्य आणि राष्ट्रीय मतदान सरासरीच्या कमी असलेली मतदान टक्केवारी यावेळी मुंबईकर मतदार निश्चितपणे मागे टाकतील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून या लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. स्वीपच्या माध्यमातून चारही मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविले. कधी सेलीब्रिटींचे मतदानासाठी आवाहन, गृहनिर्माण सोसायटी मध्ये जाणीव जागृती तर कधी आशा आणि अंगणवाडी कार्यकर्तींच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदानाचे महत्व पटवून दिले. कधी पथनाट्याच्या माध्यमातून तर कधी विविध मेळाव्यांतून शासकीय यंत्रणा मतदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने या लोकसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेत अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदारांचा हक्क बजावावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.

व्होटर्स स्लिपचे वाटप, मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर देण्यात येणाऱ्या सुविधा यामुळे मतदारांना सुलभ मतदान करता येईल. असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे, यासाठी व्होटर्स हेल्पलाईन ॲप सुरु केले आहे. या ॲपद्वारे मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधता येणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तब्बल 74 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांना मतदानासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी शेड, दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी व्हील चेअर आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांची उभारणी आणि त्याठिकाणची व्यवस्था कऱण्यात आली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here