डोंबिवली एमआयडीसी मधील मृत कामगारांच्या वारसांना व जखमींना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

             मुंबई, दि. 12 :- डोंबिवली एमआयडीसी येथे फेज दोन मधील कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा – पुन्हा घडू नये यासंदर्भात शासनास अनेक सूचना केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.

एमआयडीमध्ये अशा स्फोटाच्या घटना घडू नयेत, यासाठी नियमावली करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. अशा घटनांमध्ये मृतांच्या वारसांना व जखमींना तात्काळ शासकीय मदत करण्यात यावी. डोंबिवली येथील सर्व कंपन्यांचा सर्व्हे करून धोकादायक व नियमाचा भंग करणाऱ्या कंपन्यांवर उचित कार्यवाही करण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. प्रत्येक हॉस्पिटल मध्ये बर्न वॉर्ड तयार करावा. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्व कारखान्यांच्या कर्मचारी व अधिकारी यांना द्यावे. अनधिकृत व्यवसाय व कारखाने तात्काळ बंद करावेत. उद्योग सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने सर्व कारखान्यांची नियमित तपासणी करावी व त्या तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात. औद्योगिक सुरक्षा कायद्यामध्ये आवश्यक बदल करावेत. यात कामगार व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. सर्व कर्मचाऱ्यांचे विमा संरक्षण करण्यासाठी या कारखान्यांना अनिवार्य करावे, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शासनास दिल्या आहेत.

000

संजय ओरके/विसंअ/