पुणे, दि. १४: आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
विधानभवन येथे याविषयी झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे सर्वांना प्रेरणा देणारे महान व्यक्तीमत्व असून त्यांचे स्मारकही समाजाला प्रेरणा आणि लाभ देणारे व्हावे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी. काम सुरू असतानाच पुतळा तयार करणाऱ्यांकडेही मागणी नोंदवावी. लहुजी वस्ताद यांच्या कार्याची माहिती देणारे प्रसंग साकारण्याची व्यवस्था, कौशल्य विकास प्रशिक्षण, वसतिगृह आदी कामे गतीने करावेत. कामे दर्जेदार करावीत. निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
स्मारकासाठी जागेच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास जागेची मोजणी तात्काळ करुन घ्यावी. जागेसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास महानगरपालिकेने चांगल्यात चांगले वकील नेमावे. त्यासाठी वेळप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता यांचीही मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
0000