क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
16

पुणे, दि. १४: महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

स्मारकासाठीच्या सभोवतालच्या जागेचे भूसंपादनासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका दोन्ही यंत्रणा रक्कम देणार आहे. स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रसिद्ध करण्याच्यादृष्टीने गतीने काम करावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

फुलेवाडा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावा

सन १९९२ साली पुणे शहारातील महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. हे स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  करण्यात आलेले आहेत.

या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी लगतचे जागामालक आणि भाडेकरु यांना मोबदला यासाठी भूमिसंपादनाची आवश्यक तेवढी रकमेची मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. त्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here