मुंबई, दि. 19 : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (FIDE) व इंडियन ऑईल यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 19 ते 21 जून 2024 या कालावधीत करण्यात आलेले आहे.
विविध देशांतील कारागृहांत बंदीस्थ असलेल्या बंदीवानांना बुद्धिबळ (Chess) या खेळामध्ये प्रशिक्षण देऊन विविध देशांतील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे व तुरूंगातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा काही कौशल्ये आहेत, ज्याआधारे आपण समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू, असा आत्मविश्वास बंदिवानांमध्ये निर्माण करणे हा या परिषदेच्या आयोजनाचा मुख्य हेतू आहे.
परिवर्तन प्रिझन टू प्राईड नई दिशा या उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाच्या बंदीवानांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. या स्पर्धा प्रत्येक वर्षी नवीन देशांत आयोजित करण्यात येणार आहेत.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता म्हणाले, येरवडा कारागृहातील बंद्यांच्या संघाने सुवर्णपदक मिळविले आहे, ही बाब निश्चित आनंदाची आहे. त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत. याचा आवाका निश्चित वाढविण्यात येईल. येथून पुढे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यात येतील. तसेच जास्तीत जास्त महिला बंदीवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल. सुवर्णपदक प्राप्त बंदीवानांना शिक्षेत विशेष माफी देऊन प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. बंदीवान हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत आहेत. मागच्या वर्षी एक प्रयत्न म्हणून आम्ही बंदीवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरूवात केली होती आणि आता एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन येरवडा कारागृहात करण्यात आलेले आहे. सुरूवातीला बंदीवानांना बुद्धिबळाबाबत काहीच माहिती नव्हते. पण त्यांचा रोज चार ते पाच तास तयारी करून मागच्या वर्षी सुवर्णपदक मिळविलेले आहे. बाहेर सर्व सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे जमणार नाही ते आमच्या कारागृहातील बंदीवान खेळाडुंनी करून दाखविले. सध्या येरवडा कारागृहात महिला व पुरूष असे 200 बंदी बुध्दीबळ शिकत आहेत.
यावेळी इंडियन ऑईलच्या डायरेक्टर (HR) श्रीमती रश्मी गोविल म्हणाल्या, बुद्धिबळामुळे मनाला चालना मिळते व समोर आलेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे कौशल्य निर्माण होते.
या प्रसंगी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, इंडियन ऑईलच्या संचालक (मानव संसाधन) रश्मी गोविल, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वोगेटलिन, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग व फाईड प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
००००
राजू धोत्रे/विसंअ/