मुंबई, दि. 20 : मातंग समाजाच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक, वाटेगांव, जि. सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मारक, पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे स्मारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना आदींबाबत वेगाने कार्यवाही करण्यात यावी. मातंग समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन सकारात्मक आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, मातंग समाज शिष्टमंडळाच्यावतीने प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, श्री. वाडेकर आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी सहभागी झाले होते.
काही राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गाचे जातीनिहाय उपवर्गीकरण केले आहे. त्या संदर्भात अवलंबिलेल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती पाठविण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये ही व्यवस्था तेथील पूर्ण अभ्यास करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी योजना राबविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
वाटेगांव येथील स्मारकासाठी जमीन भूसंपादन कायद्यानुसार संपादित करण्याच्या सूचना, मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगली जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच लहुजी साळवे स्मारकाच्या कामाला पुणे येथे असताना भेट देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
*******
निलेश तायडे/विसंअ/