छत्रपती संभाजीनगर, दि. 26 : नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी विभागीय आयुक्त जगदिश मिनीयार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी श्री गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त अनंत गव्हाणे, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, डॉ. सिमा जगताप, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधला. मराठवाड्यातील शेती, टंचाई तसेच सामाजिक विषयांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व मिळून समन्वयाने काम करूया, असेही ते म्हणाले.
श्री. गावडे हे 1990 मध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर रूजू झाले होते. वाई येथे प्रांत अधिकारी, पुणे येथे राजशिष्टाचार विभागात उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, विदर्भात एमआयडीसीचे सीईओ पदावर त्यांनी काम केले आहे.
सन 2007 मध्ये त्यांना आयएएस पदावर बढती मिळाल्यानंतर गोंदिया जि. प. सीईओ, अहिल्यादेवीनगर येथे मनपा आयुक्त, नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, पर्यटन विभागाचे संचालक व मानवी हक्क संरक्षण विभागाचे सदस्य सचिव या पदावरही त्यांनी काम केले आहे.