विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२७: महाराष्ट्र विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत वि.स. पागे, जयंतराव टिळक, रा.सू. गवई अशा अनेक ज्येष्ठ सदस्यांच्या विचारांची परंपरा लाभलेली असून या सभागृहाच्या माध्यमातून संसदीय आयुधांचा वापर करून सदस्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्वश्री सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया हे पाच सदस्य २१ जून २०२४ रोजी निवृत्त झाले. या निवृत्त झालेल्या सदस्यांना आज विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास व औकाफ पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधान परिषदेतील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वरिष्ठ सभागृहाच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांनी सभागृहाचा लौकिक वाढवला, पावित्र्य जपले. विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्यांनी आपापल्या भागाचे प्रतिनिधित्व करून त्या भागातील समस्यांना न्याय मिळवून दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी निवृत्त झालेल्या सदस्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. विचारमंचाचे सभागृह आहे. विविध वैचारिक चर्चा या सभागृहात होतात. मर्यादित सदस्य संख्या असल्यामुळे त्यांच्या विचाराला या ठिकाणी वाव मिळतो. त्यामुळे सदस्यांना मत मांडण्यासाठी वेळ मिळतो. सदस्य आपले विचार सविस्तर मांडून जनतेला न्याय देण्याचे काम करू शकतात. निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी या सभागृहात उत्कृष्ट असे काम केले असल्याचे सांगून त्यांनी सर्व सदस्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व निवृत्त होणाऱ्या सदस्यांचे सभागृहातील कामगिरी, योगदानाबद्दल अभिनंदन केले. विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाचे वेगळे महत्त्व आहे. या महत्त्वाच्या सभागृहात काम करून सभागृहात जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठीचा अनुभव आल्याने भविष्यात अधिक उत्तम काम आपल्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जनतेबद्दलची तळमळ त्यांना नक्कीच पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल आणि राजकीय व सामाजिक कार्यामध्ये यापुढेही त्यांची प्रगती होत राहील, असे त्यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व निवृत्त सदस्यांचे सभागृहाच्या कामकाजात सहकार्य मिळाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, उपसभापती म्हणून सभागृहात कामकाज पाहत असतांना सदस्यांच्या स्वभावाची जाणीव होते. कोण सभागृहात बोलतात, कोणाला बोलायला देणे आवश्यक असते हे लक्षात आले. सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया या सर्व सदस्यांचे सभागृहातील योगदान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः नरेंद्र दराडे यांनी तालिका सभापती म्हणून दिलेले योगदान नेहमी लक्षात राहील, असे त्या म्हणाल्या.

प्रत्येक निवृत्त सदस्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांनी यावेळी निवृत्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या. निरोप समारंभ का महत्त्वाचा असतो, हे सांगताना त्यांनी कै. प्रमोद नवलकर यांचा निरोप समारंभ राहिल्याची आठवण करून दिली. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी विधानपरिषदेचे नियम, कार्यकाळ आणि सदस्य निवड यांविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह निवृत्त होणारे सदस्य सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे यांनी आपला अनुभव कथन केला. तर आमदार राजेश राठोड, डॉ.मनीषा कायंदे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार डॉ.सत्यजित तांबे यांनी केले. समारंभानंतर उपस्थित सर्वांचा विधिमंडळाच्या प्रांगणात एकत्रित फोटो काढण्यात आला.

00000000