विधानपरिषदेच्या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शोकप्रस्ताव

मुंबई, दि. 27 : विधानपरिषदेचे माजी दिवंगत सदस्य गंगाधर गाडे, मधुकर वासनिक, मधुकर देवळेकर,  वसंत मालधुरे आणि बळवंतराव ढोबळे यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत शोक प्रस्तावाद्वारे दुःख व्यक्त केले. या माजी सदस्यांना सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिवंगत माजी सदस्यांच्या कार्याचा गौरव केला. गंगाधर गाडे यांच्याबाबत बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, श्री.गाडे यांनी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नोव्हेंबर 1999 ते एप्रिल 2000 या कालावधीत राज्य मंत्रिमंडळात पर्यटन खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते. मधुकर देवळेकर यांच्याबाबत संवेदना व्यक्त करताना उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, श्री.देवळेकर हे 1978 ते 1982 मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर काम केले होते. ते अत्यंत निस्पृह सदस्य होते.

डॉ.मधुकर वासनिक यांच्या कार्याचा गौरव करताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की डॉ.वासनिक हे नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून नागपूर पीपल्स वेल्फेअर सोसायटी व पंचशील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. सन 1990 मध्ये विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून ते निर्वाचित झाले होते. वसंत मालधुरे यांच्याबाबत भावना व्यक्त करताना, श्री.मालधुरे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यांनी विदर्भातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष योगदान दिले होते. सन 1990 साली अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर ते निर्वाचित झाले होते, अशी माहिती उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिली. बळवंतराव ढोबळे यांच्याविषयी बोलताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, श्री.ढोबळे हे नागपूर महानगरपालिकेत अनेक वर्ष सदस्य होते. नागपूर मधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून 1998 साली ते विधानपरिषदेवर निर्वाचित झाले होते.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/