महाराष्ट्राच्या जीडीपीत जैन समाजाचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८ : विकासाला केंद्र स्थानी ठेवून आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यानिमित्ताने दिवसभर जीडीपी बाबत चर्चा व चिंतन झाले. राज्याच्या प्रगतीत व जीडीपीला वाढविण्यात जैन समाजाने दिलेले योगदान मोठे आहे, असे गौरोवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

नागपूर येथील पगारिया इस्टेटमध्ये आयोजित जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, जेबीएन महाकुंभाच्या मेगा राष्ट्रीय व्यापार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पगारिया गृपचे प्रमुख उज्ज्वल पगरिया मंचावर उपस्थित होते.

औद्योगिक गुंतवणुकीसाठी भारताने प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला. भारताकडे मोठ्याप्रमाणात गुंतवणूकदार आकर्षित झाले. चायनाच्या आकर्षणापेक्षा भारताची विश्वासार्हता प्रधानमंत्री मोदींनी सिद्ध करून दाखवली. भारत हा गुंतवणूकदारांसाठी सागर असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात जीएसटी लागू करताना जगाला संभ्रम होता. अनेक अडचणीवर मात करून जीएसटीला भारताने यशस्वी करुन दाखविले असे ते म्हणाले. देशाच्या विकासाच्या घोडदौडीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुढे आहे. गुजरात,दिल्ली, कर्नाटक  राज्यांच्या पेक्षा महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक जास्त आली आहे. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते व या राज्यावर त्यांचा विश्वास आहे असे ते म्हणाले.

देशाचे बिजनेस पावर हाऊस महाराष्ट्र आहे. येत्या काळात महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी जैन समूहाचे योगदान असेच मिळत राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. जैन समाज संख्येने कमी असला तरी व्यापार, उद्योगात या समाजाने संपत्ती व रोजगार निर्मिती करून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत केले. जैन उद्योग नेटवर्कच्या (जेबीएन) च्या माध्यमातून साध्य होणारी प्रगती कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

उज्ज्वल पगरिया यांनी स्वागत पर भाषण केले. जितो संघटनेच्या वतीने उज्ज्वल पगरिया, कांतीलाल ओसवाल, उल्लास पगारीया यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.

०००००