विधानपरिषद लक्षवेधी

0
12

दावोस येथील गेल्या तीन वर्षातील केलेल्या सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार -उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि.२९ : थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योगसमूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची (एमओयू),गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सलग दोन वर्षांपासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम स्थानावर असून यावर्षी दावोस येथे तीन लाख ७२ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रत्ने आणि दागिन्यांचा (जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क) मोठा प्रकल्प नवी मुंबई येथे सुरु करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात दावोस येथे उद्योग विभागाच्या तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत आणि इतर विभागांच्यावतीने किती सामंजस्य करार करण्यात आले, त्याची अंमलबजावणी या सर्वांची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभागाद्वारे काढली जाईल, असे सांगून श्री. सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरपासून जवळच शेंद्रा येथे असलेल्या ऑरिक सिटी अंतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉअरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्टयात मोठ्या संख्येने विविध परदेशी कंपन्यांनी भरीव गुंतवणूक करत आपले उद्योग सुरु केलेले आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात  निर्माण झालेल्या आहेत, त्यासोबतच अनेक नवीन परदेशी उद्योग समूह या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती यावेळी दिली.

तसेच ऑरिक सिटीमध्ये मोठ्या प्रकल्पांना बाधा न होणारी मुख्य ठिकाणी असलेली  जमीन  ही एमएसईबीसाठी  राखीव  ठेवली जाईल. तसेच त्या  ठिकाणी  होणाऱ्या एमएसईबीला पूरक योजना उपलब्ध करुन दिल्या जातील. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज, चितेगाव, शेंद्रा, बिडकीन येथील एमआयडीसींना एकमेकांसोबत जोडणारा अंतर्गत वाहतुकीसाठीच्या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव ही तयार असून  येत्या महिनाभरातच त्याचे काम सुरु करण्यात येईल. तसेच ऑरिक सिटी पासून ९८० किमी अतंरावर असलेल्या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया ही लवकरच सुरु करण्यात येणार आहे, या ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा लाभ येथील उद्योजक, उत्पादन वितरणाला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे सांगून दक्षिण कोरियाचा ह्युंदाईचा प्रकल्प पुण्यात येत आहे. या कंपनीने चार हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याचे ठरवलेले आहे. ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती, मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

या चर्चेत विधानपरिषद सदस्य सचिन अहिर, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

००००

वंदना थोरात/विसंअ

 

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू – उद्योगमंत्री उदय सामंत

 

मुंबई,दि.29 : मुंबईत मोठ्या प्रमाणात एडिस डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. ती नष्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू असून राज्यभरात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सदस्य  प्रसाद लाड यांनी मांडली होती.

मंत्री श्री.सामंत  म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी १४ मृत्यू डेंग्यूने झाले होते यंदा डेंग्यूने एकही मृत्यूची नोंद नाही. डेंग्यू या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९८० एडिस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली होती. यंदा एडीस डासांची ४३,४२८ उत्पत्तीस्थाने आतापर्यंत नष्ट केली आहेत. अळीनाशक फवारणी देखील केली आहे. तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव हा राज्यभरात दिसतो. यासाठी राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागही डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

      पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. त्या अनुषंगाने त्वरित उपाययोजना करण्याची सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास केली. यावर स्थानिक प्रशासनास उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठित करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २९ : सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृश्यमान होणाऱ्या जाहिरात फलकांचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून जाहिरात फलकांच्या कायद्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. याबाबत तज्ञांची नावे, काही सूचना आल्यास त्याचा स्वीकार करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

घाटकोपर, मुंबई येथे १३ मे २०२४ रोजी महाकाय जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या अपघाताबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले की, भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी शासन प्रयत्नशील असून डिजिटल होर्डींग्ज संदर्भातही सर्वेक्षण केले जाईल. अनधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर नियमानुसार कारवाई केली जाईल. या अपघातात जखमी व्यक्तींपैकी ज्या १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा जास्त उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.१६ हजार प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी एकूण रु.२ लक्ष १६ हजार इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. जखमी व्यक्तींपैकी १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा कमी उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.५ हजार ४०० प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या अपघात ग्रस्तांपैकी १७ मृत व्यक्तिंच्या वारसांना राज्य शासनाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रु.५ लाख या प्रमाणे एकूण रु.८५ लाख, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु. ४ लाख याप्रमाणे एकूण रु.६८ लाख व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यानुसार मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रु.११ लाख इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

या अपघाताच्या अनुषंगाने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त अहवालातील निष्कर्षांच्या आधारे शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. समितीद्वारे पुढील चौकशीची कार्यवाही सुरु आहे तसेच, तत्कालीन पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्याकडून प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचे निर्दशनास आल्याने त्यांना शासनाने निलंबित केले आहे. संबंधित घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृश्यमान होणाऱ्या जाहिरात फलकास परवानगी घेणे अनिवार्य आहे. शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकाशचिन्हे जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता नियमन व नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे उचित कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती, श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

 

या चर्चेत सदस्य सुनील शिंदे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल परब, भाई जगताप, अभिजित वंजारी, सचिन अहिर, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

००००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच – सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) दादाजी भुसे

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचे काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा,  समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावे, असे मुख्यमंत्री यांचे निर्देश असून जनभावनेचा आदर करुनच कार्यवाही करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

राज्यात नव्याने शक्तिपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे, यासंदर्भात सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

श्री. भुसे यांनी सांगितले की हा महामार्ग महत्त्वपूर्ण असून लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थाने, संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच औंढ नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड), माहूर, अक्कलकोट, गाणगापुर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल. वर्धा ते सिंधूदुर्ग हा प्रवास सध्या १८ तासांत होतो तो या महामार्गामुळे अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे.यातुन वेळेची, इंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होईल, अशी माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

 

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुढील आठवड्यात याबाबत सदस्यांसोबत  सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी बैठक घ्यावी, असे सूचित केले.

या लक्षवेधीत सदस्य  शशिकांत शिंदे,भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

0000

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/

 

जामखेड येथील संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 29 :अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या मुला-मुलींनी कॉलेजचे अध्यक्ष व व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे.कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार याची काळजी घेतली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य  प्रा. राम शिंदे यांनी मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, रत्नदीप मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर ता.जामखेड जिल्हा अहमदनगर मधील एकाच आवारात व इमारतीत विविध सात महाविद्यालये चालवली जातात.या संस्थेविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हितानुसार निर्णय घेतला आहे तसेच संस्थेविरोधात प्राप्त तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई देखील सुरू आहे.संस्थेत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी लवकरच मदत मिळणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. 29 : जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठीची कार्यवाही सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

८ ते ११ एप्रिल या दरम्यान राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानापोटी भरपाई मिळावी, अशी लक्षवेधी सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली होती.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यात केवळ ८ ते ११ एप्रिल २०२४ याच कालावधीत पडलेला अवकाळी पाऊस नाही, तर जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत पडलेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागातील पंचनामे करावेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिका-यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे या भागात २ लाख ९१ हजार४३३ हेक्टर क्षेत्रात पंचनामे प्राप्त झाले आहेत. त्याच्यामध्ये ३ लाख २३ हजार २१९ शेतकरी आहेत. ४९५ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत.या नुकसानासाठी मदतीच्या निकषापेक्षा जास्त देण्यात यावी यासाठी  जुलैपर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here