आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. : २९: आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगरपरिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी संस्थानचे पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क असून गेल्या २ वर्षात २७५ कोटींची वैद्यकीय मदत गरजूंना देण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कोणत्या आजारांसाठी देण्यात येतो व निधी  मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही यावेळी देण्यात आली.