पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
14

पुणे, दि. २९: आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन इंद्रायणी नदी घाट परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण  दराडे,  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पिंपरी चिंचवड औद्यगिक परिसरातील कंपन्याचे दूषित पाणी इंद्रायणी नदीत येणार नाही याची दक्षता घ्यावी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी वारी सोहळा,  कार्तिक एकादशी या दिवशी लाखो संख्येने भाविक येत असतात.  याव्यतिरिक्त वर्षभर भाविकांची मांदियाळी येथे सुरू असते. नदीचे महत्त्व आणि पावित्र्य लक्षात घेऊन इंद्रायणी नदीचा घाट आणि पाणी वर्षभर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here