मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २९ : ‘हेचि दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा’….विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

वारकऱ्यांचे प्रबोधन करावे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत दोन चित्ररथ आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. या चित्ररथाचा प्रारंभ आज मंत्रालय प्रांगणातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. वारीत आस्था, अस्मिता आणि परंपरा घेऊन जाण्याचे काम आपले कलापथक करीत असल्याचा आनंद व्यक्त करीत वारीत जाणाऱ्या कलाकारांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, इतरांनी हेवा करावा अशी राज्याची परंपरा आहे. वारकऱ्यांचे भाव पाहिले की कळते जगात सर्वात सुखी वारकरी आहेत. आस्था आणि अस्मितेचे प्रतिक असलेल्या पंढरपूरच्या वारीला वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळावे यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरपूरची वारी होय. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी देशातून आणि परदेशातून भक्त येत असतात. या चित्ररथांद्वारे संत सखू, संत निर्मला, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत महदंबा या स्त्री संतांची महती त्यांच्या अभंगांद्वारे भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पोवाडा, पथनाट्य आणि भारूड या कलाप्रकारांच्या माध्यमातून भक्तगणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच पुणे येथून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना, आपत्ती आल्यास घ्यावयाची काळजी, शासकीय मदत यासंदर्भातील माहिती चित्ररथामार्फत देण्यात येणार आहे.

“कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण…नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा….या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला” या संत केशवदास यांच्या रचनांवर कलापथकाने सादरीकरण केले. ‘ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय’ या गजरात मंत्रालय परिसर दुमदुमला होता. पृथ्वी थिएटरच्या कला पथकातील २४ कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले. शाहीर यशवंत जाधव यांनी अभंग सादर केले.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं.