विधानसभा प्रश्नोत्तरे

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच पेपर फुटीबाबत कायदा आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 1 : स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, आशिष शेलार, भास्कर जाधव, अनिल देशमुख, प्रकाश आबिटकर, रोहित पवार यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दोन वर्षात एक लाख पदे भरण्याची ऐतिहासिक कामगिरी या शासनाने केली आहे. शासनाने 75 हजार पदे भरतीची घोषणा केली होती. त्यापैकी 57 हजार 452 जणांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत, तर 19 हजार 853 जणांना नियुक्तीचे आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे. 31 हजार 201 पदांसाठी भरतीची कार्यवाही सुरु आहे. या पुढील काळात निरंतर भरती प्रक्रिया सुरू राहील. गट ‘क’ वर्गाच्या जागा टप्प्याटप्प्याने एम.पी.एस.सी.कडे वर्ग करण्यात येणार आहेत. गट ‘क’ वर्गाच्या रिक्त पदांची भरती यापुढे एम.पी.एस.सी मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत राजपत्रित पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेर परीक्षा घेण्याबाबत व या परीक्षेशी संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मृद व जलसंधारण विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. सदर परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएसतर्फे होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

 

प्रदर्शनांची ठिकाणे, ‘गेम झोन’ मधील वीज पुरवठ्याची व्यवस्था तपासणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 1 : राज्यात बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी मोठी प्रदर्शने भरविण्यात येतात. तसेच काही शहरांमध्ये  ‘गेम झोन’ आहेत. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामध्ये वीज पुरवठ्याबाबत परवानगीचाही समावेश असतो. प्रदर्शनांची ठिकाणे, गेम झोन आदी ठिकाणी वीज पुरवठ्याबाबत असलेल्या व्यवस्थेची महावितरणमार्फत तपासणी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

कात्रज (जि. पुणे) येथे फोरेन सिटी प्रदर्शनात आयोजनातील त्रुटीमुळे एका मुलाचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत सदस्य राहुल कूल यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य आशिष जयस्वाल, योगेश सागर, प्राजक्त तनपुरे यांनीही सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रदर्शने, गेम झोन यामध्ये वीज पुरवठ्याबाबत यापूर्वी दिलेल्या परवानगीची, तेथील वीज पुरवठ्याची तपासणी करण्यात येणार आहे. कुठेही कात्रजच्या घटनेप्रमाणे अपघात होऊ नये, याची काळजी घेण्यात येईल. विद्युत पुरवठ्याबाबत यंत्रणेतील असलेल्या दोषांबाबत, वारंवार नागरिकांना येणाऱ्या समस्यांबाबत मागील काळात मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या यशापयशासंदर्भातील अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल. उपलब्ध मनुष्यबळावर महावितरण काम करीत आहे. यासोबत मनुष्यबळ उपलब्धतेसाठी कंत्राटी व्यवस्थाही उभारण्यात आलेल्या आहेत. महावितरणला अधिकचा महसूल असलेल्या ठिकाणी इतर ठिकाणांपेक्षा पर्याप्त मनुष्यबळ देण्याविषयी तपासून कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

0000

 नागपूर शहरातील लहान हॉटेलांची तपासणी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 1 : नागपूर शहरात छोटी – छोटी हॉटेल्स सुरू झाली आहेत. काही ठिकाणी पाच – सहा खोल्यांचे मिळून हॉटेल चालविली जात आहेत. अशा हॉटेलचा सर्रास व्यवसाय सुरू झालेला आहे. या छोट्या हॉटेलची संपूर्ण तपासणी करून येथील व्यवसायांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येणार आहेत, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अशा हॉटेलना भेटी देण्याची दिनदर्शिका तयार करावी. त्यानुसार नियमित भेटी देऊन अशा छोट्या-छोट्या हॉटेलची तपासणी करावी. या ठिकाणी अवैध काम सुरू नसल्याची खात्री पोलिसांनी करावी.

0000

नीलेश तायडे/विसंअ/