मुंबई, दि. ०४ : गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे ५० विद्यार्थी प्रवेश संख्येचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन २०२४- २५ पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय ३१ जानेवारी २०१२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्याच्यादृष्टीने त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही व कागदपत्रांची पूर्तता या संदर्भात निकष पूर्ण करण्यात आले आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास अनुमती दर्शविली असल्याची माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
पुढील शैक्षणिक वर्षापासून ही विद्यार्थी संख्या वाढविण्यात येईल. नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे गोकुळदास तेजपाल रुग्णालय व कामा रुग्णालयांशी संलग्न असेल. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून दक्षिण मुंबईतील जनतेला रुग्ण उपचार सेवा तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यामुळे सर्व विभागाच्या समन्वयातून व प्रयत्नातून हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यंदाचे शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून कार्यान्वीत करण्यात येत माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
००००
शैलजा पाटील/विसंअ/