नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी कामगारांच्या सानुग्रह अनुदान मागणीबाबत सकारात्मक विचार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 :- नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी मर्यादित या नोंदणी रद्द झालेल्या सूतगिरणीच्या कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी मानवी दृष्टिकोनातून विचार करण्यात येईल. यासाठी वस्त्रोद्योग विभागाने प्रस्ताव सादर केल्यावर तो मंत्रिमंडळ समितीसमोर सादर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवनात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दालनात आज नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या जमीन विक्रीमधून प्राप्त रकमेतील ५० टक्के रकमेतून या सूतगिरणीतील कामगार व कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम सानुग्रहक अनुदान स्वरूपात मिळण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव विरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त अविशांत पंडा यांच्यासह वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी, सूतगिरणीचे कामगार व कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सूतगिरणी कामगारांची आर्थिक स्थिती आणि आकस्मिक सूतगिरणी बंद केल्यामुळे कामगार व कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा विचार मानवी दृष्टिकोनातून करण्यात येईल. सानुग्रह अनुदानासाठीचा प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाने तयार केल्यावर तो मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. आमदार श्री. कुंभारे, आमदार श्री. दटके यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.

हातमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसमवेत बैठक

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, नागपूर येथील कर्मचाऱ्यांच्या सहावा वेतन आयोगाच्या थकबाकीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करीत वस्त्रोद्योग विभागाने प्रस्ताव सादर करावा. तो मंत्रिमंडळाच्या समितीसमोर सादर करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/