अपर तहसील कार्यालयांच्या निर्मितीबाबत दांगट समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुबंई, दि. ९ : राज्यातील नवीन महसूल कार्यालय निर्मिती व महसूल विभागातील अन्य विषयांबाबत शिफारशी करण्याकरिता निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून या महिनाअखेर शिफारशी येतील. त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात जनतेच्या सोयीच्या दृष्टीने अपर तहसील कार्यालयांच्या निर्मितीबाबत तत्पर कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य आमश्या पाडवी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते.
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, जनसामान्यांच्या सोयीच्या दृष्टीने जनतेला व्यापक स्वरुपात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय यंत्रणांना पायाभूत, विस्तारीत सुविधा उपलब्ध करुन देण्याची महसूल विभागाची भूमिका आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये अपर तहसील कार्यालय निर्मितीबाबत शासनास प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये विभागीय आयुक्त नाशिक विभाग कार्यालयाकडून मोलगी येथे अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीचा ही प्रस्तावाचा समावेश आहे. त्यानुसार अक्कलकुवा तालुक्यातील १९४ गावांपैकी ७९ गावांकरिता मोलगी येथे अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीचा प्रस्तावित आहे.
याबाबत लोकप्रतिनीधींकडूनही शासनास निवेदने प्राप्त झालेली आहेत. नवीन महसूल कार्यालय निर्मिती संदर्भात गठित करण्यात आलेल्या दांगट समितीकडून या महिन्याच्या आत शिफारशी प्राप्त होतील. जिल्ह्याच्या मुख्यालयापासूनचे तहसीलचे अंतर, लोकसंख्या, इतर बाबी यांचे प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत समिती शिफारशी करणार आहे. त्याचे अवलोकन करुन तहसील कार्यालयास मान्यता देण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच अपर तहसीलदार यांना पुरेशी यंत्रणा, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही विभाग प्रयत्नशील आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात यंत्रणांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी निश्चितपणे निर्णय घेतला जाईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विक्रम काळे, महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, गोपीचंद पडळकर, वजाहत मिर्जा आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
0000
वंदना थोरात/विसंअ/
चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक सहाय्य प्राप्त- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुबंई, दि. ९ : नागपूर येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हज प्रा.लि. धामणा या कारखान्यामध्ये सेप्टी प्युज व मायक्रो कॉर्डचे (फटाक्यांची वात) उत्पादन पॅकिंगचे काम सुरु असताना झालेल्या स्फोटातील दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक सहाय्य देण्यात आल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री श्री.खाडे बोलत होते.
या अपघातात मृत झालेल्या कामगारांच्या वारसास प्रत्येकी २५ लाख रुपये नुकसान भरपाई डिमांड ड्राप्टद्वारे देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून ९ मृत कामगारांच्या वारसांकरिता प्रत्येकी १० लाख असे एकूण ९० लाख अर्थसहाय्य जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. त्यांच्या वारसांची नोंद झाल्यावर त्यांना ही रक्कम दिली जाईल, असे मंत्री श्री.खाडे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे कारखान्यात झालेल्या अपघाताच्या चौकशी दरम्यान फटाक्यांच्या वातींच्या उत्पादन प्रक्रियेकरीता व्यवस्थापनाने परवानगी न घेता काही रोजंदारी कामगांराना कामावर ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे परवानगी न घेता कामगार संख्येत वाढ केल्याबाबत भोगवटादाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागाकडून कारखान्याचे भोगवटादार व व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली होती. तसेच केंद्र शासनाच्या पेट्रोलियम ॲण्ड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन विभागाच्या चौकशी अहवालानुसार फटाक्याच्या वातीचे बंडल्स इलेक्ट्रीक सिलींग मशीनद्वारे पॅकिंग करताना आग लागून स्फोट झाल्याचे नमूद केले आहे. परंतु नियमानुसार या कंपनीत कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक इक्पिमेंट वापरण्यास कायद्याने मनाई असतानाही ती वापरल्याचे आढळून आले आहे. नियम भंग केल्यामुळे त्यांच्यावर संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच कारखान्याचा उत्पादन परवाना निलंबित करण्यात आला असून तो कायमस्वरुपी बंद करणेबाबत कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत कामगार विभागाने अशा प्रकारच्या उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे सर्वेक्षण केल्याची माहिती मंत्री श्री.खाडे यांनी यावेळी दिली.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून अशा कारखान्यांची केलेली पाहणी, त्या संदर्भात घेतलेली दक्षता याबाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना यावेळी दिल्या.
या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विक्रम काळे, भाई जगताप, सतेज पाटील, अभिजीत वंजारी आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
०००
वंदना थोरात/विसंअ/