मुंबई दि. २३ :- सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या पोशाखाचा (युनिफॉर्मचा) रंग सशस्त्र दले व पोलीस यांच्या पोशाखाशी मिळता जुळता राहू नये याची खबरदारी घेतली जावी. यासाठी सुरक्षा रक्षकांच्या पोशाखाच्या रंगाबाबत गृह विभागाची संमती घेऊनच पोशाखाचा रंग निश्चित केला जाईल, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.
सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक यांचा पोशाखाचा रंग बदल करण्याबाबत कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह कामगार मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. खाडे म्हणाले की, सुरक्षा रक्षकाला देण्यात येणारा पोशाखाचा रंग चांगला असावा. आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आलेल्या पोशाखाच्या रंगाचे नमुना कापड (सॅम्पल) गृह विभागाकडे पाठविण्यात येईल. त्यास गृह विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या पोशाखासाठी तो रंग अंतिम करून याबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ