महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि.२३ :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) मधील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून  सकारात्मक भूमिका  घेतली असून कालबद्ध पदोन्नती, बोनस, प्रलंबित फरक या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा करू व या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

‘मजीप्रा’ अंतर्गत विविध विषयांबाबत मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार महेश बालदी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे  प्रधान सचिव संजय खंदारे, मजीप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सेवेत असताना मृत्यू झाल्याने ४६० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा पद्धतीने नियुक्ती देण्यात आली आहे.  यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या ३५०० रूपये वेतनवाढ दिली आहे.

यावेळी मजीप्रा संचालक मंडळाची बैठक होऊन विविध योजनांतील कामांचा आढावा घेण्यात आला. कर्मचारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी अनुकंपाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत मंत्री श्री.पाटील यांचे आभार मानले.

००००

 

किरण वाघ/विसंअ