आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

पालघर दि.23 (जिमाका) : आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आपल्याला बहुआयामी धोरणाची आवश्यकता आहे आदिवासी बांधवांसाठी त्यांच्याच गावात रोजगार निर्माण केल्यास त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. वाडा तालुक्यातील गलतारे येथील  इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे चेंज मेकर्सचा गौरव राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी श्री.बैस बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, वाडा प्रांताधिकारी  आगे पाटील   इस्कॉन चे संचालक गौरांग दास प्रभू, इस्कॉनच्या संचालिका मैथिली देसाई  तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व इस्कॉन चे पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असून याची सुरुवात शाळे पासून विशेषतः आदिवासी आश्रमशाळा पासून करणे आवश्यक आहे. आदिवासी बांधव आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी इतर शहरात पाठवत नाहीत त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये आदिवासी मुलींची संख्या कमी आहे. आदिवासी आणि ग्रामीण मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वसतिगृहे निर्माण करण्याची गरज आहे. आदिवासी समुदयाच्या विकासासाठी  कॉर्पोरेट, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, आणि इस्कॉन सारख्या संस्थांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते चेंज मेकर्स हा पुरस्कार देऊन विद्यार्थी,महिला व शेतकरी  यांना गौरविण्यात आले.

*******