मुंबई, दि. 23 : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे आलेल्या विविध पालखी, दिंड्यांमधील लाखो वारकऱ्यांना आरोग्य विभागाच्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात आली. मागील वर्षीपासून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम लोकप्रिय झाला आहे. यावर्षी 21 जुलैपर्यंत 15 लाख 12 हजार 774 वारकऱ्यांची विनामूल्य आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेनुसार रुग्णांवर उपचार करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला.
श्री. संत गजानन महाराज शेगाव, जि. बुलढाणा, श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर पालखी कौंडण्यपूर जि. अमरावती, श्री. संत मुक्ताबाई मुक्ताईनगर जि. जळगाव यासह श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी जि. पुणे, श्री संत तुकाराम महाराज देहू जि. पुणे, श्री संत एकनाथ महाराज पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर आदी जवळपास छोट्या – मोठ्या अनेक दिंड्यांमधून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला आले. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी या उपक्रमातून आरोग्य विभागाने घेतली आहे.
प्रत्येक पाच किलोमीटरवर एक याप्रमाणे 258 तात्पुरते ‘आपला दवाखाना’ ची सुविधा निर्माण करण्यात आली. वारी दरम्यान 6 हजार 368 आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 5 खाटांचे तात्पुरता अति दक्षता विभाग (आयसीयू) सज्ज ठेवण्यात आला होता. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
पालखी मार्गावर 102 व 108 रुग्णवाहिका सेवा असलेल्या 707 रुग्ण वाहिकांनी अविरत सेवा दिली. रूग्ण वाहिकेमार्फत 1561 वारकऱ्यांना अति तातडीची सेवा देण्यात आली. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना 5885 आरोग्य कीट देण्यात आले होते. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती. महिला वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी एकूण 136 स्त्री रोगतज्ञ कार्यरत होते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 136 हिरकणी कक्षांची स्थापना करण्यात आली होती. पालखी बरोबर एकूण 4 आरोग्य पथके सुसज्ज रुग्ण वाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत राहणार आहेत. पालखी मार्गावर 186 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला. मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर ूफवारणीदेखील करण्यात आली.
वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार असे सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर ताप, सर्दी, खोकला, ड्रेसिंग, जुलाब चा त्रास झाल्यास सेवेसाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात आली होती. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यासाठी 212 आरोग्यदूत बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
महाआरोग्य शिबिरांमधून वारकऱ्यांची आरोग्य सेवा
पालखी मार्गावरील आरोग्याच्या सुविधांव्यतिरिक्त आरोग्य विभागाने पंढरपूर शहरात वाखरी, 3 रस्ता, गोपाळपूर या तीन विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन 14 ते 18 जुलै दरम्यान करण्यात आले. पंढरपूरमधील 65 एकर व गोपाळपूर येथे रूग्णालयाची व्यवस्थाही उभारण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी 6 अतिदक्षता विभाग, 14 तात्पुरता आपला दवाखाना तर ग्रामीण भागात 26 ठिकाणी अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आले होते. ही सुविधा गोपाळकालापर्यंत असणार आहे. तसेच एकूण 121 आरोग्य दुतामार्फत आरोग्य सेवा देण्यात आली. महाआरोग्य शिबिरांत विशेषज्ञ 153, वैद्यकीय अधिकारी 490, पॅरामेडीकल कर्मचारी 541, नर्सेस 426, आशा कार्यकर्ता 466, अन्य कर्मचारी 636 व स्वयंसेवक 1000 अशाप्रकारे एकूण 3712 मनुष्यबळांकरवी आरोग्य सेवा देण्यात आली आहे.
0000
निलेश तायडे/विसंअ