मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई दि.२३ : मतदार यादी अद्ययावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी २५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर २७ व २८ जुलै २०२४ तसेच ३ व ४ ऑगस्ट २०२४ या दिवशी मुंबई शहर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व बीएलओ सर्व मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव नसलेले नाव नोंदणी करु शकतात, नावांमधील दुरुस्ती करून घेवू शकतात तसेच नाव स्थलांतरित करुन घेवू शकतात. ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीनेही करता येतील. यासाठी बीएलओंमार्फत गृहभेटी कार्यक्रमही आखण्यात आला आहे. पुनरीक्षण मोहीम कालावधीत नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे आदीसारखे कार्यक्रम राबविले जातील.

मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदार याद्यांचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना, मतदार यादीमधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे फोटो बदलून चांगल्या प्रतीचे फोटो सुनिश्चित करणे, मतदार यादीमधील विनिर्देशन आणि मानवेतर प्रतिमा, जेथे आवश्यक असेल तेथे बदल करणे. विभागांची पुनर्रचना करणे आणि विभाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेस अंतिम रुप देणे, त्यानंतर मतदान केंद्रांच्या यादीची मान्यता घेणे. कंट्रोल चार्ट अद्ययावतीकरण करणे, नमुना एक ते आठ तयार करणे.

प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे : गुरुवार (२५ जुलै), मतदार यादीवरील दावे व हरकती स्वीकारणे (२५ जुलै ते ९ ऑगस्ट). विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम असा : मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निश्चित झाल्यावर दावे व हरकती निकाली काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मिळवणे, डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी यादी तयार करणे यासाठी सोमवार (ता. १९ ऑगस्ट) पर्यंत मुदत आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता. २० ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या बैठकीत मतदार नोंदणी वाढवणे आणि जन जागृती करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा. तसेच मतदार नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, जिल्ह्यात १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला भेट द्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी केले.

या बैठकीस स्वीपच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  श्यामसुंदर सुरवसे, संबंधित उपजिल्हाधिकारी, तसेच कामगार, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

शैलजा पाटील/विसंअ