मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

ठाणे, दि. 24 (जिमाका) : शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी काम करीत असते. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष श्री.अनिल गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, वाहतूक उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड,महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, पोलीस उपायुक्त एस.व्ही.शिंदे, रस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, एमएमआरडीए मुख्य अभियंता एस.के.सुरवसे, अधीक्षक अभियंता रमेश खिस्ते, भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी.एस.साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.ए.तांबे, कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अवर सचिव दिपाली घोरपडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, मुंबई-ठाणे-नाशिक हा महामार्ग ठाणे ते वडपे असा 23 किलोमीटर आणि वडपे ते नाशिक 97 किलोमीटर असा मिळून 120 किलोमीटरचा असून महामार्गावर असणारे खड्डे तातडीने बुजवा, पुन्हा खड्डे होणार नाहीत, याची काळजी घ्या. पुलांची कामे लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी योग्य नियोजन करुन काम पूर्ण करा. आसनगावजवळील रेल्वे पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. हा पूल तयार होण्यासाठी तीन महिने लागणार आहेत, मात्र तोपर्यंत सध्या जो पूल आहे, त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करुन वाहतूक सुरळीत करा.

ते पुढे म्हणाले, वडपे पासून पुलाची कामे लवकरात पूर्ण करा. अवजड वाहनांना वाहतुकीसाठी योग्य वेळेचे बंधन घालून वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणती वाहने कोणत्या लेनमध्ये चालली पाहिजेत, याचे नियोजन करा. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे ते वडपे  या भागात वाहतूक पोलिसांच्या मदतीला 170 पोलीस मित्र देण्यात आले आहेत. यांचा समन्वय साधून वाहतूक नियंत्रणाविषयी योग्य ते नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी आपापसात आवश्यक तो समन्वय साधून नागरिकांना त्रास कमीत कमी कसा होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

मुंबई-नाशिक महामार्ग सुव्यवस्थित करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. अशा वेळी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे जनतेला आवाहन करुन श्री.भुसे यांनी बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची  संबधित अधिकारी-यंत्रणांनी  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, अशा अत्यंत कडक शब्दात उपस्थितांना इशारा दिला.

बैठकीच्या सुरुवातीस मंत्री महोदयांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि शेवटी मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनांचे पालन सर्व संबंधित अधिकारी-यंत्रणांकडून अत्यंत गांभीर्याने करण्यात येईल, असे आश्वस्त केले.