बीड जिल्ह्यातील खरीप २०२३ चा उर्वरित पीकविमा तातडीने वितरित करा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

0
11

मुंबई, दि. 24 : बीड जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये अग्रीम 25 टक्के प्रमाणे वितरित झालेल्या पीकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम हा पीक विमा संबंधित विमा कंपनीने तातडीने अदा करावा. यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवालाची पुनर्तपासणी करावी व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

बीड जिल्ह्यासह बुलढाणा, यवतमाळ यांसह विविध जिल्ह्यातील प्रलंबित पीक विमा याबाबत आज कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

काही ठिकाणी पीक नुकसानाबाबतची माहिती विमा कंपनीस उशिरा मिळाली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी संबंधित नुकसानाच्या अहवालांची बारकाईने पुनर्तपासणी केली जावी. अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर द्यावयाच्या अंतिम रक्कमा निश्चित करताना सरासरी उत्पन्न व अन्य निकषांचा योग्य पद्धतीने विचार व्हावा, अशा सूचना देखील श्री. मुंडे यांनी दिल्या.

या बैठकीस या बैठकीस कृषी संचालक विजयकुमार आवटे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

खरीप 2023 मध्ये बीड जिल्ह्यातील 18 लाख 51 हजार अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. आतापर्यंत 391 कोटी 97 लाख रुपये इतका विमा मंजूर करण्यात आला असून, यापैकी 328 कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे. आणखी 67 कोटी 12 लाख रुपयांचे वितरण सुरू आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व अंतिम अहवाल यानुसार या रक्कमेत आणखी वाढ होणार आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here