बचाव आणि मदतकार्यासाठी राज्य प्रशासन आणि राज्य आपत्ती निवारण यंत्रणेनी सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २५ :- मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. लहू माळी यांनी त्यांना परिस्थितीची आणि यंत्रणांची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी नियंत्रण कक्षातून राज्यातील प्रमुख शहरांचे महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घेतली. तसेच बचाव व मदतकार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे. नागरिकांसाठी बचाव व मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले आहे.
००००